
पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी जाहीर झाली असून, एकूण ३५ लाख ५१ हजार ४६९ इतके मतदार मतदान करू शकणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ सूस-बाणेर-पाषाण हा सर्वाधिक एक लाख ६० हजार २४२ मतदारांचा आहे. तर सर्वांत कमी ६२ हजार २०५ मतदार हे प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर इंदिरानगर येथे आहेत. एकूण ४१ प्रभागांपैकी १० प्रभागांमधील मतदारसंख्या ही एक लाखाच्या पुढे आहे. त्यामुळे येथील उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाली असून, त्यातील आरक्षित प्रभागही निश्चित झालेले आहेत. त्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. प्रारूप मतदार यादी करताना अनेकदा एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात जातात. त्यावरून मोठा गोंधळ होतो. मतदारांची विभागणी झाल्याने उमेदवारांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागते. त्यामुळे प्रारूप मतदारयादी करताना महापालिकेचे कर्मचारी व्यवस्थित काम करत आहेत की नाही, यावर लक्ष ठेवून असतात. तर प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर मतदारयादीतील नावे तपासली जातात. चुकीची नावे घुसली असतील तर हरकत घेता येते.निवडणूक आयोगाने प्रारूप मतदारयादी करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आयुक्त नवलकिशोर राम यांनी गुरुवारी ही प्रारूप मतदारयादी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी एक जुलै २०२५पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांची यादी पात्र असणार आहे. यानुसार ४१ प्रभागांमध्ये ३५ लाख ५१ हजार ४६९ इतके मतदार आहेत. प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज हा प्रभाग पाच सदस्यांचा असला तरी या ठिकाणची मतदारसंख्या ही एक लाख ४८ हजार इतकी आहे. पण यापेक्षा जास्त मतदारसंख्या ही प्रभाग क्रमांक ९ सूस-बाणेर-पाषाण या प्रभागाची आहे. येथील मतदारसंख्या तब्बल एक लाख ६० हजार इतकी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु