
परभणी, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
यंदाच्या अतिवृष्टीने शहरातील गोरगरीब, झोपडपट्टी भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना मदत वाटपात गंभीर विसंगती झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनादरम्यान पक्षाच्या वतीने असे नमूद करण्यात आले की, अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरून जनतेचे मोठे नुकसान झाले. शासनाने मदत जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ती मदत काही मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचली. ज्यांचे घर प्रत्यक्ष पाण्यात बुडाले, ज्यांचे साहित्य व संसार उद्ध्वस्त झाले, अशा अनेकांना मात्र मदतच मिळाली नाही.
यावरून नागरिकांमध्ये “एकाला तुपाशी आणि दुसऱ्याला उपाशी” अशी भावना निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
या प्रकरणी संसद रत्न खासदार डॉ. फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली विविध भागातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपली कैफियत मांडली. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या प्रतिसादात संबंधित प्रकरणांवर योग्य ती कार्यवाही करून पात्र नागरिकांना मदत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष लखन चव्हाण यांनी झोपडपट्टी भागातील महिलांच्या समस्या स्पष्टपणे जिल्हाधिकारी आणि खासदार फौजिया खान यांच्या समोर मांडल्या. कार्याध्यक्ष लताताई इंगडे, शिवा नेटके, रामा वाकुडे, सय्यद इसाक, संदीप इंगडे यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis