
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)
आमदार रवी राणा यांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. “हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हे काँग्रेसच्या लोकांनाही माहीत नाही,” असे म्हणत त्यांनी त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चिखलदऱ्याच्या गरजांचा त्यांना अभ्यास नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
रवी राणा यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून चिखलदऱ्याचा विकास सुरू झाला असून तो अधिक वेगाने व्हावा यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी चर्चा करून भाजप उमेदवार अल्हाद कलोती यांना पाठिंबा दिला.” तसेच काँग्रेसच्या नऊ ते दहा उमेदवारांपैकी अनेक जण चिखलदऱ्यात नसल्याची टीकाही त्यांनी केली.काँग्रेसच्या उमेदवारांना सन्मानाने भाजपमध्ये घेतले जाईल, असे ते म्हणाले. “चिखलदऱ्यात काँग्रेसच्या तिकीटावर कोणी लढायला तयार नाही,” असा दावा त्यांनी केला. तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडत, “त्यांनी बिहारमध्ये प्रभारी म्हणून दिवा लावला नाही,” असा खोचक आरोप केला.
“ठाकूर मंत्री असताना आम्ही हनुमान चालीसा म्हटली म्हणून आम्हाला 14 दिवस जेलमध्ये टाकलं. त्या वेळी त्यांना दादागिरी दिसली नाही,” असे रवी राणा म्हणाले.काँग्रेसचे उमेदवार लोकशाही पद्धतीने भाजपकडे येत असल्याचा दावा करत, सपकाळ व ठाकूर यांनी आत्मचिंतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.तर आ राणा यांच्या टीकेला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी उत्तर देत जोरदार शब्दात टीका करत हल्लाबोल केला. “आमच्या भावाला जोग मारायची सवय आहे… नाटक, नौटंकी सगळे प्रकार करायची सवय आहे,” अशा शब्दांत त्यांनी रवी राणांवर शाब्दिक प्रहार केला.रवी राणा कोणत्या पक्षात आहेत हे त्यांनीच ठरवावे, अशी टोलेबाजी करत ठाकूर म्हणाल्या, “आजची वस्तुस्थिती अशी आहे की भाजपने संपूर्ण अमरावतीचा पक्ष राणा दाम्पत्याच्या खुट्याला बांधून ठेवला आहे.”तसेच त्या म्हणाल्या की, रवी राणा करत असलेली “गुंडांगीरी जनतेला अजिबात पसंत नाही.”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधत म्हटले, “आदरणीय मुख्यमंत्री यांनी अख्खा अमरावतीचा पक्ष राणा दाम्पत्याच्या खुट्याला बांधला आहे.”पुढे बोलताना त्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या भवितव्याबाबतही टिपण्णी केली. “काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणताय… पण माझी पांढऱ्या दगडावरची काळी रेष अशी आहे की, भाजपचा तुमचा उपयोग संपला की भाजप तुम्हाला फेकून देईल,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी