
परभणी, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। सेलू नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. दोन अध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार — अशोक अंभोरे आणि ऍड. भगवान शिरसाट — यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. तसेच एमआयएमच्या प्रभाग 5 (ब) मधील उमेदवारासह एकूण 32 अपक्ष उमेदवारांनी अर्ज परत घेतले.
यामुळे आता अध्यक्ष पदाच्या रिंगणात 7 उमेदवार तर नगरसेवक पदाच्या 26 जागांसाठी तब्बल 113 उमेदवार निवडणुकीत कायम राहिले आहेत.
अध्यक्षपदासाठी अपक्षांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांसह अन्य सात उमेदवारांमध्ये चुरस अधिक वाढली आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे जोरदार शक्तीप्रदर्शन आणि रणनीतींमुळे निवडणुकीची लढत तापली आहे.
नगरसेवक पदासाठी 26 जागांवर 113 उमेदवार उभे राहिल्याने तेरा प्रभागांत तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या अंतिम दिवशी सेलूमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या असून शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज मागे घेण्याची धावपळ सुरू होती.
दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत प्रमुख लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दिसत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट), एमआयएम तसेच अनेक अपक्ष उमेदवारही रिंगणात असल्याने सामना रंगतदार होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis