
पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे ग्रँड चॅलेंज दूर सायकलिंग स्पर्धा 2026 आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापन लक्षात घेता मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 तसेच शासन गृह विभागाच्या 19 मे 1990 च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी 19 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 00.01 वा. ते 20 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 24.00 वा. तसेच 24 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 24 वा. ते 26 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 24 वा. या कालावधीत सिंहगड परिसरातील खालीलप्रमाणे वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने या कालावधीत सिंहगड किल्ला मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. मौजे पानशेत, खानापूर, डोणजे, अतकरवाडी या बाजूने सिंहगड घाटमार्गाने खेड-शिवापूरकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात येत आहे.
उक्त परिसरातील नागरिकांनी डोणजे चौक – खडकवासला – किरकटवाडी – नांदेड सिटी – वडगाव धायरी मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (पुणे–बेंगळुरू महामार्ग) वापरून खेड-शिवापूरकडे प्रवास करावा.
नागरिकांनी स्पर्धेच्या सुरळीत आयोजनासाठी वाहतूक यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु