
रायगड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। सामाजिक भान जपत अनेक गरजूंच्या पाठीशी उभे राहणारे पनवेलमधील शिंदे गटाचे कट्टर शिवसैनिक राहुल गोगटे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ५१ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. अलीकडील मुसळधार पावसामुळे मराठवाड्यासह अनेक भागात मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले. हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गोगटे यांनी पूरपीडितांना दिलासा मिळावा या हेतूने आर्थिक मदत पुढे केली आहे.
ही मदत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द केली. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि आवश्यक खर्चासाठी ही मदत उपयोगी ठरेल, असे गोगटे यांनी सांगितले. समाजकारण, शिवसेनेप्रती निष्ठा आणि जनतेसाठी सदैव तत्पर असणारे कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या गोगटे यांनी संकटाच्या काळात हात पुढे करून शिवसैनिक म्हणून सामाजिक जबाबदारी पार पाडली.
धनादेश सुपूर्द करताना भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक श्रीनंद पटवर्धन उपस्थित होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांना सर्वसामान्यांनीही हातभार लावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर असली तरी राज्य सरकार आणि विविध सामाजिक संस्थांनी बचाव व मदतकार्याला गती दिली आहे. अशा वेळी सर्व घटकांनी संवेदनशीलता दाखवून पूरग्रस्त कुटुंबांना सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके