
सोलापूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथील जैन हरिजन वस्तीतील शिक्षकाने वैयक्तिक कारणास्तव रजा काढल्यामुळे रजेसाठी शाळेलाच सुट्टी देण्याचा अजब प्रकार घडला. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीन-तेरा वाजू लागले आहेत. एकीकडे ग्रामपंचायती करमाफी करून शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे शिक्षण विभागाकडूनच शिक्षक नसल्याने शाळा बंद ठेवल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी नाइजास्तव गरिबांच्या मुलांना खासगी शाळांत जावे लागत आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उचेठाण येथे चार प्राथमिक शाळा असून, त्यापैकी जैन हरिजन वस्ती येथील प्राथमिक शाळेतील एक शिक्षक ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. तर दुसऱ्या शिक्षकाची बदली झाली आहे. त्यामुळे या शाळेत शिक्षक नाहीत. सध्या शिक्षण विभागाकडून दुसऱ्या शाळेवरील शिक्षक आलटून पालटून शिकवण्यासाठी पाठवले जात असले तरी त्याही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा खेळखंडोबा होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड