ठाण्यातील सरकारी शाळांसाठी अमेझॉनचा ‘थिंक बिग स्पेसेस’ डिजिटल शिक्षण उपक्रम सुरू
ठाणे, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग आणि पाय जाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने अमेझॉनने ''अमेझॉन थिंक बिग स्पेसेस'' ची सुरुवात केली आहे. ठाण्यातील सरकारी शाळांमध्ये शाश्वत, सर्वसमावेशक डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून
Thane


ठाणे, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग आणि पाय जाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने अमेझॉनने 'अमेझॉन थिंक बिग स्पेसेस' ची सुरुवात केली आहे. ठाण्यातील सरकारी शाळांमध्ये शाश्वत, सर्वसमावेशक डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमातील पहिले केंद्र येऊर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ६५ मध्ये सुरू करण्यात आले.

या समारंभाला ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. सचिन सांगळे, अमेझॉन वेब सर्व्हिसेसचे (AWS) संचालक – APAC DCPD कॅमेरॉन इव्हान्स, आणि पाय जॅम फाउंडेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शोएब दार या प्रमुख मान्यवरांसह शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षक-नेतृत्वाखालील अमेझॉन थिंक बिग स्पेसेस आणि STEM कॉर्नर्स हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवावर आधारित, हँड्स-ऑन (Hands-on) माध्यमातून शिकवण्यावर भर देणारे आहेत. या माध्यमातून ठाणे मनपाच्या नऊ शाळांमधील ९०० हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार असून विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक कौशल्य वाढविण्यासाठी अभ्यासक्रमात कॉम्प्युटेशनल थिंकिंग (Computational Thinking) आणि डिझाइन थिंकिंग (Design Thinking) समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक समस्या ओळखता येतील आणि तंत्रज्ञान-आधारित उपाययोजना करता येतील.

पायाभूत सुविधांसोबतच शिक्षकांच्या कौशल्यवृद्धीलाही या उपक्रमात महत्त्व देण्यात आले आहे. ICT आणि इतर विषयांतील २५० शिक्षकांना संगणक विज्ञान व कोडिंगचे सर्वसमावेशक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून एकूण ७,५०० विद्यार्थ्यांपर्यंत सकारात्मक परिणाम पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.

२०१९ मध्ये सुरू झालेल्या 'अमेझॉन थिंक बिग प्रोग्राम' मधून नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेतील ५५ शासकीय शाळांमध्ये सुरु असलेल्या 'अमेझॉन थिंक बिग स्पेसेस' आणि कॉर्नर्सद्वारे १२,००० विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रयोग, शोध आणि नवोन्मेषासाठी प्रोत्साहन देत असून वास्तव जगातील समस्या समजून त्यावर उपाय शोधण्याची क्षमता वाढवतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande