नाशिक मनपा निवडणुकीसाठी यंदा वाढले तीन लाख मतदार
सर्वाधिक सिडकोत तर सर्वात कमी सातपूर येथे मतदार नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। महानगरपालिकेच्या निवडणुकीत दुबार मतदारांची नावे कायम असल्याने त्यांच्या नावासमोर स्टार करण्यात आले आहेत. या मतदारांच्या घरी बीएलओ जाऊन कोणत्या ठिकाणी मतदान करणार याचा फॉ
नाशिक मनपा निवडणुकीसाठी यंदा वाढले तीन लाख मतदार


सर्वाधिक सिडकोत तर सर्वात कमी सातपूर येथे मतदार

नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। महानगरपालिकेच्या निवडणुकीत दुबार मतदारांची नावे कायम असल्याने त्यांच्या नावासमोर स्टार करण्यात आले आहेत. या मतदारांच्या घरी बीएलओ जाऊन कोणत्या ठिकाणी मतदान करणार याचा फॉर्मच भरून घेणार आहेत. तसेच जे फॉर्म भरू शकणार नाही, त्यांना मतदानाच्या दिवशी ज्या केंद्रावर जातील त्याठिकाणी असाच प्रश्न विचारणारा फॉर्म भरून घेण्यात येणार आहे, त्यामुळे त्यांना दोन ठिकाणी मतदान करता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी काल मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. नाशिक महानगरपालिकेचे मुख्यालय आणि सर्व विभागीय कार्यालयात ह्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत १० लाख ७३ हजार ४०८ मतदार होते. यात महिला मतदारांची संख्या ५ लाख २ हजार ६३७, तर पुरुष मतदारांची संख्या ५ लाख ७० हजार ६९९ इतकी होती. यंदा ही संख्या सुमारे तीन लाखांनी वाढली आहे. यंदा निवडणुकीसाठी १३ लाख ५४ हजार ७७ मतदार आहेत. यात ७ लाख ४११ पुरुष, तर ६ लाख ५३ हजार ५८७ महिला मतदार आहेत.

या मतदारयादीत केवळ कोणाचा पत्ता बदल झाला असेल तरच त्यात दुरुस्ती होईल. अन्य कोणताही बदल केला जाणार नाही. काही मतदारांच्या पत्त्यासमोर शून्य असे नमूद आहे ते देखील कायम ठेवण्यात आले आहे. तो अधिकार महापालिकेला नाही. त्यामुळे दुबार आणि पत्त्यांचा घोळ कायम आहे. दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये सर्वाधिक ५८ हजार २४६ मतदार आहेत. तर सर्वांत कमी मतदार सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये केवळ ३१ हजार ५२१ इतके आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande