नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; गडकरी यांचे आदेश
पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने आणि प्राधान्याने सुरू कराव्यात, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट
पुणे


पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने आणि प्राधान्याने सुरू कराव्यात, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत, अशी माहिती पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

नवले पूल येथे नुकत्याच झालेल्या अपघातात आठ जणांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत हा अपघात व उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

‘नवले पुलाजवळील अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट्स’ ची संख्या कमी करण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती गडकरी यांना दिली. त्यानंतरही नुकत्याच झालेल्या अपघातानंतर अधिक प्रभावी व तातडीची पावले उचलण्याची गरज असल्याकडे गडकरी यांचे लक्ष वेधले. तसेच या अपघातानंतर पुण्यात महापालिका, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन, पोलिस व महामार्ग प्राधिकरणासोबत घेतलेल्या बैठकांमध्ये निश्चित झालेल्या उपाययोजनांबाबतचा अहवालही गडकरी यांच्याकडे सादर करत याबाबत केंद्रीय स्तरावर तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणी केली,’ असे मोहोळ म्हणाले.

बैठकीत चर्चिले गेलेले मुद्दे

- अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर ठोस चर्चा

- एनएचएआयमार्फत रस्त्याची रचना.

- खेड-शिवापुर टोल नाक्यावर वाहनांचा लोड तपासणे

- टोल नाक्यावर आरटीओ मार्फत वाहनांची यांत्रिक तपासणी.

- वेगमर्यादेवर नियंत्रण आणणे.

- बॅरिकेडिंग व सिग्नल यंत्रणेत सुधारणा.

- धोकादायक ठिकाणांची पुनर्रचना.

- ठरावीक अंतरावर रम्बलर स्ट्रीप्सची संख्या वाढवणे

- सर्व यंत्रणांमधील समन्वय वाढविणे.

कोट

नवले पूल येथील अपघात थांबावेत, यासाठी मा. नितीनजी गडकरी यांची भेट घेत या संदर्भातील बैठकांचा अहवाल सादर केला. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.

मुरलीधर मोहोळ,

केंद्रीय राज्यमंत्री सहकार व नागरी विमान वाहतूक

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande