
पुरस्कारप्राप्त गणेशोत्सव मंडळांचा सत्कार
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)
एकाच प्रकल्पावर दोन निधी उपलब्ध होऊ नयेत, यासाठी पायाभूत सुविधांचे युनिक आयडी तयार करण्यात येत आहे. यावर्षी हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावरील असला तरी पुढील वर्षीपासून याचा उपयोग करणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे बांधकाम आणि कार्य करणाऱ्या कार्यालयांनी पायाभूत सुविधांचे युनिक आयडी तयार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.जिल्हा नियोजन सभागृहात आज आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, उपवनसंरक्षक अर्जूना के. आर., निता कट्टे, आदर्श रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आदी उपस्थित होते. बैठकीत यावर्षीच्या स्पीलचा निधीबाबत आढावा घेण्यात आला. स्पीलच्या निधी मागणी बाबत तातडीने आढावा घेण्यात यावा. काम करणाऱ्या यंत्रणांकडून स्पीलच्या निधीची मागणी घेऊन कार्यान्वयन यंत्रणांनी नियोजनकडे तात्काळ सादर करावी. यामुळे गेल्या दोन वर्षांपासूनची कामे पूर्ण होण्यास मदत होईल. अद्यापही प्रशासकीय मान्यता घेतलेली नसलेल्या विभागांनी येत्या आठ दिवसांत परिपूर्ण प्रस्ताव निधी मागणीसह सादर करावा. येत्या काळात निवडणूक असल्याने प्रशासकीय मान्यता देण्यास अडचण येणार आहे. त्यामुळे प्रशासकीय मान्यता तातडीने घेण्यात याव्यात. लोकप्रतिनिधींनी कार्यालयाला दिलेल्या पत्रावर तातडीने कार्यवाही करावी. पत्रावर केलेली कार्यवाही तातडीने संबंधित लोकप्रतिनिधींना कळवावी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संवाद कक्षातर्फे कळविण्यात आलेल्या पत्रावर तातडीने कार्यवाही करून कळवावे. येत्या वर्षापासून पायाभूत सुविधांचा युनिक आयडी तयार करावा लागणार आहे. त्यामुळे लॉगीन आयडी तयार याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यावेळी जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाबद्दल एकविरा गणेशोत्सव मंडळ, अमरावती, द्वितीय क्रमांक बद्दल बाल गणेशोत्सव मंडळ, साऊर, ता. भातकुली, तृतीय क्रमांक बद्दल राजे वीर संभाजी मंडळ, चांदुर रेल्वे, तालुकास्तरीय प्रथम क्रमांक बद्दल लोकमान्य उत्सव समिती, शिंदी बु., ता. अचलपूर गणेशोत्सव मंडळांचा सत्कार करण्यात आला. तसेच युनिक आयडी तयार करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी