
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
भातकुली तालुक्यातील खोलापूर अंतर्गत वाठोडा शुक्लेश्वर येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य पथक केंद्रात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्राच्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडून आतमध्ये शेणफेक करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.याआधीही याच प्रकरणासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन खोकले यांनी खोलापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याची माहिती असून, त्या तक्रारीवर कोणतीही दखल न घेतल्याने प्रकार पुन्हा सुरू झाल्याची चर्चा ग्रामस्थांत रंगात आहे.घटनास्थळी दिसलेल्या स्थितीनुसार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मद्यधुंद टवाळखोरांनी शासकीय इमारतीलाच लक्ष्य केले असल्याचे संकेत मिळत आहेत. आरोग्य केंद्र गावापासून काही अंतरावर असल्याने येथे टवाळखोरांची गर्दी वाढली असून, मद्यपानासाठी हा परिसर ‘हॉटस्पॉट’ बनल्याची स्थानिकांची व्यथा आहे. सकाळी कर्मचारी आरोग्य केंद्रात पोहोचले असता खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, तसेच प्रवेशद्वाराजवळ शेणफेक झाल्याचे अंगावर येणारे चित्र दिसून आले. शासनाने नागरिकांच्या आरोग्य सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीची अशी दुरवस्था होत असल्याने ग्रामस्थांत रोष आहे.घटनेची माहिती मिळताच सरपंच मोहम्मद रिजवान यांनी रुग्णालयाची पाहणी केली. काचा फुटलेल्या अवस्थेत आणि घाणफेक झालेली स्थिती पाहून त्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीमार्फत पोलीस तक्रार दाखल कली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी