
रायगड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। संयुक्त भारत खेल फौंडेशनतर्फे थिम्पू (भूतान) येथे झालेल्या १२ व्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पनवेलमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद चव्हाण आणि त्यांच्या पत्नी विभा चव्हाण यांनी भारतासाठी सुवर्णमय कामगिरी नोंदवली. या भव्य स्पर्धेत भारत, भूतान, थायलंड, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स अशा ११ देशांतील सुमारे ७६५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
नवी मुंबई निवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष असलेले विनोद चव्हाण आणि त्यांची पत्नी विभा चव्हाण, जे रायगड जिल्ह्यातील निवृत्त पोलिस उपअधिक्षक आहेत, यांनी भारतीय संघातून प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत लाँग टेनिस प्रकारात निवृत्त पोलिस उपायुक्त तथा निवृत्त पोलिस संघटनेचे सहअध्यक्ष सिताराम न्यायनिर्गुणे यांनीही सुवर्ण पदक जिंकत महत्त्वपूर्ण यश मिळवले.
विनोद चव्हाण यांनी गोळाफेक, थाळी फेक आणि हातोडा फेक अशा तीनही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावत अभूतपूर्व कामगिरी केली. तर विभा चव्हाण यांनी गोळाफेक आणि थाळी फेक या दोन्ही खेळांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली. अशा प्रकारे एका कुटुंबातील पती-पत्नीने एकूण पाच सुवर्ण पदकं जिंकत भारताचा गौरव उंचावला. निवृत्तीनंतरही राष्ट्रीय स्तरावर देशासाठी योगदान देत असल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेत नवी मुंबईतील श्री सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उत्तम माने यांनी ७०+ गटातून भारतीय संघात सहभाग घेत तीन सुवर्ण पदके (लांब उडी, थाळी फेक, हातोडा फेक) जिंकली. तसेच रसायनीतील रिलायन्स इंडस्ट्रीज, पाताळगंगा येथे कार्यरत असलेले घनश्याम माशेलकर यांनी ५५+ गटातून १०० मीटर धावणे, लांब उडी आणि तिहेरी उडी या स्पर्धांमध्ये तीन सुवर्ण पदके मिळवत चमकदार यश मिळवले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सुवर्णमयी कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके