
पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनाचे उद्घाटन 9 जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.या जागतिक मराठी संमेलनात दिले जाणारे मानाचे पुरस्कार यंदा गोव्यातील उद्योजक अनिल खवटे यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’, तर चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांना ‘मराठी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत हे माहिती दिली.
यावेळी अकादमी सदस्य संजय ढेरे, कार्यकारिणी सदस्य महेश म्हात्रे आणि संमेलन कार्यवाह गौरव फुटाणे उपस्थित होते.या तीन दिवसांच्या संमेलनात कर्तबगार मराठी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जाणार आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांचा जीवनप्रवास समजून घेतला जाईल. याशिवाय, गोव्यातील स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु