
रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) : एक चांगला लेखक व्यवस्थेला जागे करू शकतो. संपूर्ण व्यवस्थेचे रूप बदलू शकतो, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी लेखकाच्या ताकदीची जाणीव करून दिली.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळातर्फे आज रत्नागिरीत एकदिवसीय जिल्हा साहित्य संमेलन भरवण्यात आले आहे. त्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. गवस बोलत होते. रत्नागिरीतील नवनिर्माण शिक्षण संस्थेत हे संमेलन भरले असून, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, युवा शास्त्रज्ञ डॉ. प्रतीक मुणगेकर आदी मान्यवर संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव संमेलनस्थळाला देण्यात आले आहे.
श्री. गवस पुढे म्हणाले, मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी साहित्य संमेलनांवर खर्च करण्यापेक्षा जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधले दर्जेदार साहित्य लगोलग मराठीत अनुवादित होण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले गेले पाहिजे. छोटी संमेलने जरूर व्हावीत; पण आपल्या भाषेच्या गौरवासाठी ती सरकारच्या निधीतून नव्हे, तर लोकांनी निधी उभारून केली पाहिजेत. सरकारचा निधी जगभरातले तंत्रज्ञान आपल्या भाषेत आणण्यासाठी खर्च व्हावा. तसेच सरकारने मराठी शाळा सशक्त कराव्यात.
डॉ. गवस म्हणाले, कोकणात इतकी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे झाली आहेत, की त्यांनी मराठी साहित्याचा इतिहास संपन्न केला. मराठी साहित्याचा इतिहास लिहायचा झाला, तर तो कोकणाचाच इतिहास असेल. जोपर्यंत महाराष्ट्रात श्रमिक जिवंत आहे, तोपर्यंत मराठी मरणार नाही, असे डॉ. गवस म्हणाले; मात्र आपण सारेच मराठीचे मारेकरी आहोत, असे सांगून त्यांनी मराठी भाषेच्या दुरवस्थेची सद्यःस्थिती मांडली. आपण मराठीला दैनंदिन व्यवहारातून गायब करत चाललो आहोत. म्हणी, वाक्प्रचारांचा वापर कमी झाला आहे. अनेकांची मुले सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमात शिकतात आणि तीच माणसे मराठीबद्दल गळा काढतात. वाचन या विषयासाठी अभ्यासक्रम असला पाहिजे, हे कोणाला पटत नाही. शरद पवारांसारखा एखाद-दुसरा अपवाद वगळला, तर राज्यातला एकही नेता वाचत नाही. विकास, निष्ठा हे शब्द अलीकडच्या राजकारण्यांनी बदनाम केले आहेत. या सगळ्याचा एकूण परिणाम व्यवस्थेवर होतो. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे व्यवस्थेचा उकिरडा झाला आहे. मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याच्या निर्णयाला इतकी वर्षे झाली, पण त्याचा आढावा अद्याप घेण्यात आलेला नाही आणि पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा घाट घातला जात आहे, असं डॉ. गवस म्हणाले.
लेखक हा नेहमी विरोधी पक्षनेता असतो, असे डॉ. गवस म्हणाले. जगणे समरसून पाहिजे. आपली भूमिका इतकी नीट वठवली गेली पाहिजे, की सत्तेला प्रश्न विचारता आलेच पाहिजेत. भ्रष्टाचार करून चांगली कादंबरी किंवा कविता लिहिता येत नाही. त्यासाठी जगणे पणाला लावावे लागते. आयुष्य पिळवटून टाकावे लागते. खरे बोलण्याचे धाडस दाखवावे लागते. व्यवस्था अंगावर घेण्याची ताकद लेखकात असली पाहिजे.
लिहिणे ही तलवारीवरून चालण्याची कसरत असते. त्यावर लेखक पलीकडे गेला, तर तो समाजाला जागवू शकतो; मात्र पडला तर त्याची मान जाऊ शकते. एवढी हिंमत लेखकाने जागवावी लागते. सतत व्यवस्थेच्या त्रुटीवर बोट ठेवावे लागते. तडजोडी करून लेखक होता येत नाही. एक चांगला लेखक व्यवस्थेला जागे करू शकतो. संपूर्ण व्यवस्थेचे रूप बदलू शकतो. एकट्या लेखकाने हे का करायचे, हा प्रश्न कधीच विचारू नये. कारण आपण धोक्याच्या कडेवर उभे आहोत, कडेलोटाची शक्यता आहे. कोकणाचे पर्यावरण धोक्यात आहे. किनारपट्ट्या विकल्या गेल्या आहेत जमिनी विकल्या गेल्या आहेत. रातोरात झाडांची कत्तल होणार आहे. डोंगर, झाडे गेली, तर काय राहिले कोकणात? असा सवाल डॉ. गवस यांनी उपस्थित केला.
प्रत्येकाने आपले व्यवहार मराठीतून करणे, आपल्या मुलांना चांगलं मराठी लिहिता-वाचता येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. एक भाषा मरते, तेव्हा एक संस्कृती मरते, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. मराठीला काहीही होणार नाही; पण तिला मारणाऱ्यांच्या हातातले दांडे होऊ नका, असा सल्ला डॉ. गवस यांनी दिला.
साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ म्हणाले, की भाषा आणि साहित्य या दोन घटकांची कायमच गरज लागणार आहे. त्यांनी सांगितले, भाषा ही मानवाला मिळालेली सर्वांत मोठी देणगी आहे. तिचा वापर कसा आणि किती करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. वेगवेगळ्या समाजाचं आणि संस्कृतीचे संचित ज्यात अतिशय कमी शब्दांत शब्दबद्ध केलेले असते, ते साहित्य. त्याच्या माध्यमातून आपण समाजाचा आणि संस्कृतीचा वेध घेतो. साहित्याचा संबंध आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी, कामाशी आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात गेलो, तरी सर्वांना आपली स्वतःची भाषा आणि समूहाची भाषा समृद्ध करता आली आणि साहित्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजांशी संपर्क राहिला, तर हे जग सुखी आणि समृद्ध होण्यासाठी आपण सगळे जण या ना त्या मार्गाने हातभार लावणार आहेत. आपल्या आयुष्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच अशा संमेलनांचे मी स्वागत करतो.
सकाळी साडेसहा वाजता खल्वायन संस्थेच्या उषःकाल मैफलीने संमेलनाची सुरुवात झाली. त्यानंतर काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये रत्नागिरीतल्या विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यामध्ये कोकणातल्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांची माहिती देणाऱ्या चित्ररथांचा समावेश होता. दिवसभर विविध परिसंवाद आणि अन्य साहित्यिक कार्यक्रमांचा आस्वाद साहित्यप्रेमींनी घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी