
नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.): भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांनी आज नाशिक घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली. देशातील सर्वच लोकघटकांना अस्थिरतेच्या काठावर नेण्याचे काम आजचे सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कांगो म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अथवा स्वातंत्र्य चळवळीसाठी आज सत्तेवर असलेल्या पक्षाचे कोणतेही योगदान नव्हते, त्यामुळे त्यांना लोकशाही मूल्यांचे मोलच नाही. ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामात शून्य योगदान दिले, तेच आज देशभक्तीचे अवतार असल्याचा दिखावा करत आहेत, असे ते म्हणाले.जातीय सलोखा धोक्यातदेशात जातीय व धार्मिक सलोख्याला धक्का पोहोचवणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचे कांगो यांनी सांगितले. शासनाच्या कृतीतून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असून, सामाजिक ऐक्य धोक्यात येत आहे, असा त्यांचा आरोप होता. धर्म–जातीय ध्रुवीकरण हे या सरकारचे मुख्य राजकारण झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
कामगार–शेतकरी विरोधी धोरणे
कांगो यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवरही निशाणा साधला. कामगारांना मिळणाऱ्या हक्कांवर गदा आणणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे, कंत्राटीकरण वाढवणे आणि सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण यामुळे सामान्य माणसाचे हाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी आंदोलनाला दडपण्याचे आणि कामगार संघटनांना कमकुवत करण्याचे कारस्थान सरकार राबवत आहे. देशाच्या विकासाचा खरा आधार असलेल्या वर्गांनाच पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे, असे ते म्हणाले.
सरकारची अमेरिकाधार्जिणी भूमिका
केंद्र सरकार परराष्ट्र धोरणात पूर्णपणे अमेरिकाधार्जिणी बनले असून, भारताचे स्वायत्त निर्णयक्षमता कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप कांगो यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खूश करण्यासाठी केलेले प्रयत्न उघड आहेत. अधीनतेची भूमिका स्वीकारणे हा देशाच्या परराष्ट्र धोरणाचा अपमान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आयटक कामगार केंद्र नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लोकशाही वाचवण्यासाठी एकजूट आवश्यककांगो यांनी सर्व प्रगतिशील आणि लोकतांत्रिक शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन केले. देशाला अराजकतेपासून वाचवण्यासाठी, लोकशाही अधिष्ठान मजबूत करण्यासाठी आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी एकजूट आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
नाशिक शहरात लढून बी डी भालेकर शाळा वाचवण्यासाठी यश आले आहे. शाळा सुरू होई पर्यंत पाठ पुरावा करत रहावा लागणार आहे. तसेच तपोवना तील १७००झाडे तोड निर्णय मनपा चुकीचा आहे. या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहभागी आहे. कायदेशीर हरकत एकमेव राजकीय पक्ष म्हणून पक्षाने नोंदवली आहे. पर्यावरण नाश करून सिमेंट चे जंगल उभारले जात आहे. गडचिरोलीत सुधा हजारो झाडे तोडली जाणार आहेत. आरे येथे सुद्धा आंदोलन मुळे काही झाडे वाचली आहेत. भारतीय जनता पक्ष पर्यावरण विरोधी धोरण देशभर राबवत आहे. भांडवलदाराच्या घशात जंगल देत आहे. या विरोधात लढा जनता देत आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष २६डिसेंबर रोजी १००वर्ष पूर्ण करत आहे. या निमित्ताने देशभर कार्यक्रम सुरू आहेत. २६नोव्हेंबर संविधान दिनी नागपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष वतीने लाल झेंडा मार्च आयोजित शताब्दी वर्ष निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. संविधान वाचवा देश वाचवा नारा देण्यात आला आहे. असे प्रतिपादन केले या प्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सह सचिव कॉ. राजू देसले, जिल्हा सचिव कॉ. मनोहर पगारे, कॉ. तल्हा शेख शहर सचिव , कॉ. भीमा पाटील, कॉ. व्हि डी धनवटे, कॉ भास्कर शिंदे, कॉ. दत्तू तुपे, कॉ. छबू पुरकर, कॉ. खतीब आदी पदाधिकारी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV