वास्तुविशारद संस्थेच्या रत्नसिंधू केंद्राचे रत्नागिरीत थाटामाटात उद्घाटन
रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) : भारतीय वास्तुविशारद संस्थेचे रत्नसिंधु केंद्र आजपासून सुरू झाले. या सर्वांनी संघटितपणे काम करावे. आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन जिल्ह्याच्या निसर्गाचा विचार करून, पर्यावरणाची हानी न करता जबाबदारीने आराखडे तय
वास्तुविशारद संस्थेच्या रत्नसिंधू केंद्राचे रत्नागिरीत उद्घाटन


रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) : भारतीय वास्तुविशारद संस्थेचे रत्नसिंधु केंद्र आजपासून सुरू झाले. या सर्वांनी संघटितपणे काम करावे. आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन जिल्ह्याच्या निसर्गाचा विचार करून, पर्यावरणाची हानी न करता जबाबदारीने आराखडे तयार करावेत. कोकणचा ऐतिहासिक वारसा जतन करावा. नवनवीन प्रकल्प आणणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. असे प्रतिपादन संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप प्रभू यांनी केले.

येथील अंबर हॉलमध्ये भारतीय वास्तुविशारद संस्थेच्या (IIA) रत्नसिंधु केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रत्नसिंधु केंद्रातील एका पदाधिकाऱ्याला राज्य संस्थेच्या बैठकीत सहभागी होता येईल. आपल्या भागातील समस्या तिथे मांडून त्या सोडवता येतील. देशात संस्था कसे कार्य करत आहे, याची माहितीसुद्धा मिळेल. सध्या कोकणात महामार्ग, रस्त्यांची कामे सुरू आहेत. अशा वेळी आपले विकासासाठी योगदान असले पाहिजे, असेही संदीप प्रभू यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे महाराष्ट्र सचिव शेखर बागुल, राष्ट्रीय मानद सल्लागार (कायदे समिती) राजीव तायशेट्ये, कोल्हापूर केंद्राच्या अध्यक्ष संगीता भांबुरे, स्वागताध्यक्ष तथा केंद्राचे मानद संचालक मार्गदर्शक आर्किटेक्ट संतोष तावडे रत्नागिरीचे नूतन अध्यक्ष मकरंद केसरकर, सचिव श्रेया इंदुलकर व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून या केंद्राचे उद्घाटन झाले. या प्रसंगी ज्येष्ठ वास्तुविशारद हेमंत कापडी, उपाध्यक्ष गौरी सामंत, ज्येष्ठ उद्योजक केशवराव इंदुलकर उपस्थित होते.

अध्यक्ष मकरंद केसरकर यांनी सांगितले की, आजचा कार्यक्रम होण्यासाठी युवा आर्किटेक्टनी पुढाकार घेतला. तसेच महिला आर्किटेक्टनी योगदान दिले आहे. पुढील वर्षी या केंद्राच्या पहिल्या वर्धापनदिनी २२ नोव्हेंबरला युवा वास्तुविशारद महोत्सव आयोजित करावा. त्यांना चांगली संधी या माध्यमातून मिळेल. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अवचट यांचा शुभेच्छा संदेश शेखर बागुल यांनी वाचून दाखवला. कोकण म्हणजे निसर्गाने भरभरून दिलेला प्रदेश. येथे आपले केंद्र सुरू होत असून या भागाच्या विकासाकरिता संस्थेने योगदान द्यावे, असे त्यांनी म्हटले.

उद्घाटन कार्यक्रमात डॉ. संघमित्रा फुले यांनी शुभेच्छा दिल्या. क्रेडाईतर्फे दीपक साळवी व सहकाऱ्यांनी व बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी केंद्र स्थापनेबद्दल शुभेच्छा दिल्या. क्रेडाईतर्फे नित्यानंद भुते म्हणाले की, रत्नागिरी शहर कात टाकत आहे. त्यामुळे नवीन संकल्पनांवर आधारित प्रकल्प उभे राहावेत व त्यातून रत्नागिरी सुंदर शहर म्हणून नावारूपाला येईल. याकरिता या केंद्राने महत्त्वाची भूमिका घ्यावी.

राजीव तायशेट्ये यांनी सांगितले की, विद्यार्थिदशेपासून मी आज ५३ वर्षे या संस्थेशी निगडित आहे. आर्किटेक्टचा भागीदार आर्किटेक्टच असला पाहिजे. आपल्याला कायद्याचे ज्ञान असले पाहिजे. त्याचा अर्थ समजून घ्यावा. आपल्याला हवामानाचा अंदाज, निसर्ग याचा अभ्यास करून बांधकाम कसे असले पाहिजे याचा विचार करा. झाड वाचवा, कारण झाड मोठे होण्यासाठी २०- ३० वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे ते तोडून टाकू नका. निसर्गाचे भान ठेवा. संस्थेकडून सर्व कायदेशीर मदत आपल्याला दिली जाईल.

स्वागताध्यक्ष आर्किटेक्ट संतोष तावडे म्हणाले की, या केंद्राच्या स्थापनेमुळे कोकणातले आर्किटेक्ट आता खऱ्या प्रवाहात सामील झाले आहेत. कारण १०८ वर्षांची आयआयए संघटना आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. ही ऐतिहासिक घटना आहे. मकरंद केसरकर, श्रेया इंदुलकर व सर्व युवा सदस्यांनी याकरिता खूप मेहनत घेतली.

कोल्हापूर अध्यक्ष संगीता भांबुरे यांनी सांगितले की, रत्नसिंधु केंद्राला कोल्हापूर केंद्रही नेहमीच सहकार्य करत राहील. युवा पिढी उत्साहाने काम करत आहे, त्यांना संधी देताना पुढील वर्षी नक्कीच युथ फेस्ट आयोजित करावा.

ज्येष्ठ आर्किटेक्ट हेमंत कापडी आणि इंजिनिअर मनोज जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांनीही मनोगतामध्ये संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून रत्नागिरीतील इमारती पाहण्याकरिता बाहेरून लोक आले पाहिजेत, एवढ्या सुंदर बनवूया असे सांगितले. कातळशिल्प शोधकर्ते, संशोधक सुधीर रिसबूड, ऋत्विज आपटे यांचाही सन्मान करण्यात आला.

नूतन कार्यकारिणी अशी - अध्यक्ष- मकरंद केसरकर, उपाध्यक्ष गौरी सामंत, सचिव श्रेया इंदुलकर, कोषाध्यक्ष संजना शेट्ये, कार्यकारिणी सदस्य- अभिषेक माने, मेघा पंडित, नीलेश गुंदेचा, शंकर सावंत, मंजिरी शेंड्ये, मानद संचालक, सल्लागार संतोष तावडे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande