
पुणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीचे संभाव्य वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. मार्च ते मे २०२६ दरम्यान ही सीईटी होणार आहे. गतवर्षी १२ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती.सध्या १७ अभ्यासक्रमांच्या सीईटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.यामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या १२ सीईटी, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ५ सीईटींचा समावेश आहे.
एमएचटी-सीईटीमधील पीसीएम समूहाची पहिली सीईटी ११ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ मध्ये होणार असून, दुसरी सीईटी १४ मे ते १७ मे २०२६ मध्ये होणार आहे. तर पीसीबी समूहाची पहिली सीईटी २१ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ मध्ये होणार असून, दुसरी सीईटी १० मे व ११ मे २०२६ मध्ये होणार आहे.तसेच एमबीए अभ्यासक्रमासाठी पहिली सीईटी ६ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ मध्ये होणार असून, दुसरी सीईटी ९ मे रोजी होणार आहे.एमसीए अभ्यासक्रमाची सीईटी ३० मार्चला, तीन वर्षीय विधीची सीईटी १ व २ एप्रिलला, पाच वर्षीय विधीची सीईटी ८ मे रोजी, नर्सिंगची सीईटी ६ व ७ मे रोजी,बीएडची सीईटी २७ मार्च ते २९ मार्च २०२६, बीपीएडची सीईटी ४ एप्रिल रोजी, बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए व बी. एचएमसीटी सीईटी २८ ते ३० एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. इतर सर्व पदवी व पदव्युत्तर प्रवेश परीक्षांच्या तारखा सीईटी कक्षाने जाहीर केल्या आहेत. या सर्व प्रवेश परीक्षा मार्च ते मे २०२६ दरम्यान होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु