
चंद्रपूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून चितळांचे स्थानांतर करण्याच्या उपक्रमाची यशस्वी सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 10 चितळांचे नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सुरक्षितपणे स्थानांतरण करण्यात आले.
ताडोबामध्ये चितळांना पकडून आफ्रिकन पद्धतीच्या ‘बोमा’ संरचनेत ठेवण्यात आले. ही बोमा संरचना कोलारा वनपरिक्षेत्रातील जामणीच्या विस्तीर्ण माळरानात उभारण्यात आली आहे. जामणी परिसरातील समृद्ध चितळसंख्या आणि अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे तो बोमा उभारण्यासाठी सर्वात योग्य परिसर ठरला. या उपक्रमाची तयारी मागील चार महिन्यांपासून सुरू होती.
बोमातून चितळांना विशेष तयार केलेल्या स्थानांतर वाहनांद्वारे हलविण्यात आले. या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, फॉगर, तसेच जखम टाळण्यासाठी आवश्यक कुशनिंगची सोय आहे. तसेच नर–मादी चितळांना वेगळे ठेवता येईल, अशी यात रचना करण्यात आहे. या उपक्रमासाठी अशी दोन वाहने विशेष खरेदी करून सुधारित करण्यात आली. चितळांना नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजर्समध्ये सुरक्षित पोहोचविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव