
अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यात २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र, याच दिवशी अत्यंत शुभ असा विवाहाचा मुहूर्त असल्याने अनेक कुटुंबे विवाहसोहळ्यांच्या तयारीत गुंतणार आहेत. परिणामी, मतदार मतदान केंद्राकडे वळणार की लग्नसमारंभांकडे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
'लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदान. प्रथम त्यामुळे नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडून त्यानंतरच विवाहसोहळ्यांकडे वळावे. यासाठी पहिले मतदान... मग लग्न' आणि तुमचे एक मत बदलू शकते भविष्य या संदेशांसह व्यापक जनजागृती मोहीम सुरू करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे २ डिसेंबर ही तारीख एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी ठरणार आहे.
सामाजिक संस्था आणि स्थानिक नेते नागरिकांना आवाहन करत आहेत की, विवाह सोहळ्याला जाण्यापूर्वी सकाळीच मतदान करून हक्क बजवावा. काहींनी सकाळी ७ वाजता कुटुंब, नातेवाइकांसह मतदान केंद्रावर जाण्याची तयारी केली आहे. मात्र, ज्यांचे विवाह गावाबाहेर आहेत त्यांना पहाटे निघावे लागणार असल्याने काही ठिकाणी मतदान टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मतदान की विवाह, कोणाला प्राधान्य ?मतदान टाळल्यास उमेदवार निवड आणि लोकशाहीच्या भविष्यावर होणारा परिणाम गंभीर ठरू शकतो. मतदान हा केवळ अधिकार नाही, तर जबाबदारी आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी प्रथम मतदान, नंतर मंगलकार्य असा निर्धार व्यक्त केला आहे.
विवाहाचा हंगाम आणि गावाबाहेरील गर्दीस्थानिक लग्न समारंभ मंडळे, हॉल व्यावसायिक आणि भोजन व्यवस्था करणारे सांगतात की, २ डिसेंबर हा हंगामातील सर्वाधिक मागणी असलेला शुभ दिवस आहे.अनेक कुटुंबे विवाहासाठी गावाबाहेर जाणार असल्याने पाहुण्यांची ये-जा, वरात व्यवस्था आणि समारंभातील धांदल यामुळे मतदानासाठी वेळ मिळणे कठीण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरु शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी