मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बचावलेल्या हमदानची एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट
ठाणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। दैव बलवत्तर म्हणून सुखरूप वाचलेल्या दोन वर्षाच्या हमदान मोहम्मद या दोन वर्षांच्या चिमुकल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी लहानग्या हमदानच्या तब्येतीची आस
ठाणे


ठाणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। दैव बलवत्तर म्हणून सुखरूप वाचलेल्या दोन वर्षाच्या हमदान मोहम्मद या दोन वर्षांच्या चिमुकल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी लहानग्या हमदानच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे साश्रू नयनांनी आभार मानले.

ठाण्यातील राबोडी येथे राहणारा हमदान हा दोन दिवसांपूर्वी आपल्या आजीकडे आला होता. तिथून पुन्हा घरी जाताना रिक्षा चालक असलेले त्याचे वडील गफूर मोहम्मद यांनी त्याला ठाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या ध्यानसाधना महाविद्यालया जवळील अंडरपास पाशी बोलावले. वडिलांना पाहून आजीचा हात सोडून धावत सुटलेला हमदान त्याच वेळी आनंद नगर नाल्यातील पाण्याचा उपसा करण्यासाठी मेनहॉलवर लावलेल्या पाईपवर पाय पडल्याने थेट २५ फूट खोल गटारात जाऊन पडला. स्थानिक नागरिकांनी याबाबत आरडाओरडा करून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी त्यांनी तत्काळ शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांना तिथे पाचारण केले. त्यांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना बोलवून अथक प्रयत्न करून हमदानला बाहेर काढले. मात्र नाका तोंडात गटाराचे दूषित पाणी गेल्यामुळे तसेच गटारात त्याचा श्वास गुदमरल्यामुळे तो अत्यवस्थ झाला होता. त्यावेळी तत्काळ त्याला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र त्याची तब्येत वेगाने ढासळत असल्याचे पाहून विकास रेपाळे आणि नम्रता जाधव- भोसले यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून तत्काळ त्यांच्या कानावर ही बाब घातली, त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी हमदानला पुढील उपचारासाठी ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात दाखल करायला सांगितले. तसेच रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून त्याला वाचवण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करावे यासाठी विनंती केली.

डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने आणि खाजगी रुग्णालयात वेळेवर चांगले उपचार मिळाल्याने हमदानचा जीव वाचला. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात जाऊन स्वतः हमदानची भेट घेतली, तसेच डॉक्टरांकडून त्याची तब्येत कशी आहे ते जाणून घेतले. हमदानची तब्येत आता पूर्णपणे बरी असून नाका तोंडात दूषित पाणी गेल्याने झालेला न्युमिनिया देखील आता आटोक्यात आला आहे. संकटकाळी मदतीला धावून येत आपल्या मुलाचा जीव वाचवल्याबद्दल हमदानच्या आई वडिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच वेळेत त्यांच्यापर्यंत ही बाब पोहचवून आपल्या मुलाला नवीन जीवदान मिळवून दिल्याबद्दल माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.

संकटकाळी धावून जाणे हे माणुसकी म्हणून आपले कर्तव्य होते, शिवसेना ही मदतीसाठी कायम पुढे धावून जाते, असे उपमुख्यमंत्री शिंदे अनेकदा आपल्या भाषणात सांगतात. मात्र लहानग्या हमदानच्या मदतीसाठी ते धावून गेल्याने त्यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande