
अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.) | धामणगाव शहरातील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापमान गार असले तरी राजकीय पारा चांगलाच वाढू लागला आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांची थेट लढत असल्याने शहरात राजकीय ‘ज्वर’ चढला असून उमेदवारांकडून रात्री उशिरापर्यंत गुप्त बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. या बैठकीत जुन्या नात्यांना नव्या ऊर्जेची ‘चार्जिंग’ मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
धामणगाव शहर हे दोन प्रमुख भागांत—धामणगाव आणि दत्तापूर—विभाजित आहे. रेल्वेच्या अलीकडील उत्तर भागात सहा प्रभागांमधून १२ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यात सहा जागा महिला आणि सहा पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहेत. दक्षिण भागात चार प्रभाग असून अमर शहीद भगतसिंग चौक, नेहरू पार्क, मार्केट चौक आणि दत्तापूर परिसरातून एकूण आठ नगरसेवक—चार महिला व चार पुरुष—निवडले जातील. अशा प्रकारे एकूण २० जागांसाठी ही निवडणूक होत असून प्रत्येक जागेवर भाजप–काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरू लागली आहे. प्रभागनिहाय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी घरभेटींचा धडाका सुरू केला आहे. प्रत्येक कुटुंबप्रमुखापर्यंत संपर्क साधण्यावर विशेष भर दिला जात आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक ठिकाणी जुन्या नातेसंबंधांना पुन्हा उजाळा मिळाल्याचे दिसून येत आहे. अनेक इच्छुक तसेच सक्रिय कार्यकर्ते विस्मृतीत गेलेल्या ओळखी पुन्हा जुळवून मतदारांसोबतचा संवाद वाढवत आहेत.दरम्यान, राजकीय हालचालींना वेग आल्याने धामणगावची ही निवडणूक रंगतदार व रोचक होणार असून नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी