
रायगड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. या प्रक्रियेत 107 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी 9 आणि नगरसेवक पदासाठी 98 उमेदवारांचा समावेश आहे. अर्ज माघारीनंतर नगराध्यक्षपदासाठी 34 आणि नगरसेवक पदासाठी 595 असे एकूण 629 उमेदवार अंतिम रिंगणात उरले आहेत. जिल्हाभरात आता चुरशीच्या लढती रंगण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
प्रत्येक नगरपरिषदेमध्ये उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे —
खोपोली : नगराध्यक्ष 7, नगरसेवक 118
अलिबाग : नगराध्यक्ष 2, नगरसेवक 42
श्रीवर्धन : नगराध्यक्ष 4, नगरसेवक 60
मुरूड : नगराध्यक्ष 3, नगरसेवक 58
रोहा : नगराध्यक्ष 2, नगरसेवक 51
महाड : नगराध्यक्ष 5, नगरसेवक 53
पेण : नगराध्यक्ष 3, नगरसेवक 72
उरण : नगराध्यक्ष 4, नगरसेवक 49
कर्जत : नगराध्यक्ष 2, नगरसेवक 46
माथेरान : नगराध्यक्ष 2, नगरसेवक 46
या सर्व नगरपरिषदांमध्ये मिळून 629 उमेदवारांची अंतिम लढत ठरल्याने रायगडमधील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
अनेक ठिकाणी बहुकोनी सामना असल्याने निवडणुकीत कोणाचा पलडा जड ठरेल, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. स्वतंत्र उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याने पारंपरिक पक्षांच्या गणितातही बदल होण्याची शक्यता आहे.जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व अर्जांची तपासणी आणि माघारीची प्रक्रिया सुरळीतरीत्या पार पडली असून, आता मतदान आणि प्रचाराची तयारी अंतिम टप्प्यात आहे. आगामी काही दिवसांत प्रचारमोहीम जोर धरू लागणार असून, मतदारांनाही आपल्या पसंतीचे प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके