
नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिका दोन टप्प्यांत एक हजार २८ कोटींचे रस्तेकाम करणार आहेत. याद्वारे भाविकांसाठी कनेक्टिव्हिटी सुलभ होण्याकरिता महापालिका प्रशासनाने पाऊल उचललेले आहे. दरम्यान, सिंहस्थासाठी पुणे, मुंबईकडून येणाऱ्या भाविकांसाठी भगूर-पांढलीं व्हाया सिन्नर हा रस्ता मनपा क्षेत्रातून जोडावा आणि गंगापूर रोडला नदीपलीकडेही समांतर रस्ता करावा, अशी मागणी क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी मनपा
आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे केली आहे. मंत्री कोकाटे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेतली. त्यांच्यात अर्धा तास विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी माध्यमांशी बोलताना कोकाटे यांनी आपण सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सिन्नरची नाशिक शहरासोबतची कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी सिन्नर-नाशिक रस्त्यासोबतच पांढुर्ली-भगूरमार्गे नाशिक शहरासाठी जोडून सिन्नर सोबतची कनेक्टिव्हिटी वाढेल, यासाठी या
रस्त्याचे काम करावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे म्हटले. सोबतच गंगापूर रोडला मखमलाबादकडून गोदावरी नदीला समांतर रस्ता करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोट्यवधी भाविक दाखल होणार आहेत. भाविकांना सर्वसुविधा मिळाव्यात यासाठी मनपा सिंहस्थ प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखली विविध कामे करत आहेत. यात जास्त खर्च रस्तेकामांवर होणार आहे.
प्राधिकरण अध्यक्ष गेडामांना भेटणार
भगूर-सिन्नर रस्ता कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असल्याने या रस्त्याची मागणी प्राधिकरण अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे करणार असल्याचे मंत्री कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान, गंगापूर रोडला समांतर रस्त्यासाठी अनेक ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे हा रस्ता होणार की नाही, हे लवकरच समजणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV