
पुणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
पुण्यातील नवले पूल परिसरात सातत्याने अपघात होतात. 13 नोव्हेंबरला नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर आणि कारला आग लागली आणि आठ जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर या परिसरातील अपघातांच्या कारणांचा शोध घेण्यात आला. नुकतेच याबाबत आरटीओचा अहवाल पुढे आला असून त्यातून अपघाताची धक्कादायक कारणं पुढे आली आहेत.आरटीओच्या प्राथमिक तपासणीनुसार, कंटेनर चालकाने गाडी न्यूट्रल स्थितीत ठेवली असावी आणि अतिवेगामुळे कंटेनरवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. त्यामुळे हा अपघात मानवी चुकीमुळे झाला, असे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.या अपघाताची तांत्रिक तपासणी प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुरू आहे. कंटेनरचा गिअर बॉक्स जळल्यामुळे अपघाताची नेमकी कारणे समजून घेण्यात काही अडचणी येत होत्या. यावर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासणीसह महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून माहिती गोळा केली. तपासणीत असे दिसून आले की कंटेनरचा वेग खूप जास्त होता आणि नवले पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला. प्राथमिक अहवालानुसार हा अपघात मानवी चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.पुणे आरटीओकडून सातारा ते पुणे दरम्यान वाहने तपासण्यासाठी आणखी एक पथक तयार करण्यात आले आहे. यापूर्वी फक्त एकच पथक तपासणी करत होते; आता दोन पथकांमध्ये एकूण 10 अधिकारी वाहने तपासतील. त्यापैकी एक पथक महामार्गावर फिरत राहून वाहनांची तपासणी करेल, तर दुसरे पथक टोल नाका परिसरात वाहने थांबवून तपासणी करेल. विशेषतः जड वाहनांच्या चालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जाईल. तसेच वाहनांची कागदपत्रे आणि ओव्हरलोडिंगची स्थिती तपासली जाईल.टोल नाका परिसरात जड वाहनांच्या चालकांमध्ये सुरक्षा आणि नियमावलीबाबत जनजागृतीही केली जाणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु