
अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.) वरूड–पांढुर्णा महामार्गावरील पुसलानजीक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोलनाका सुरू झाल्यापासून स्थानिक वाहनचालकांवर अक्षरशः ‘आर्थिक टोल’ बसू लागला आहे. अवघ्या एका किलोमीटर अंतरासाठी तब्बल ९० रुपये मोजावे लागत असल्याने पुसला व परिसरातील नागरिकांत संताप उसळला आहे. पुसला गावातील मोठ्या संख्येने असलेले ट्रॅक्टर, मिनी ट्रक, जेसीबी व कार यांची दिवसातून अनेकदा ये-जा होत असते. शेतमाल वाहतूक, मजूर फेऱ्या आणि शेतीकामासाठी वारंवार प्रवास करावा लागतो. टोल नाका पलीकडे अनेकांची शेती असल्याने शेतकऱ्यांना दिवसातून २–३ वेळा टोल भरावा लागणे अपरिहार्य झाले आहे. दरवेळी ९० रुपये मोजावे लागत असल्याने वाहनचालक आणि शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे. त्यामुळे पुसला ग्रामपंचायतीने येथील चारचाकी वाहनांना टोलमुक्त करण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. अन्यथा नागरिकांना मोठा फेरा करून दुय्यम मार्गांचा उपयोग करावा लागतो, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. टोल सुरू झाल्यानंतर केवळ पाच दिवसांतच नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून पुसला व आजूबाजूच्या गावांमध्ये टोलमुक्तीच्या मागणीला जोर चढला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी