
पुणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या पवना नदी पात्राला थेरगाव येथील केजुबाई बंधारा या ठिकाणी शुक्रवारी सकाळी बर्फाळ प्रदेशाचे स्वरूप आले. नदीवर तवंग (फेस) आला होता.
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यातून पवना नदी वाहते. पवना धरणापासून नदी सुरू होऊन ती दापोडी येथे मुळा नदीत विसर्जित होते. शहरात किवळे ते दापोडी असे दोन्ही बाजूंचे पवना नदीचे पात्र आहे. शहरातून नदीचे २४.४० किलोमीटर अंतर आहे. पवना धरणातून नदीत पाणी सोडले जाते.रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातून महापालिका नदीतील पाणी उचलते. अनेक ठिकाणी मैलामिश्रित पाणी आणि कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी नदीमध्ये थेट सोडले जाते. याप्रकरणी महापालिकेने गुन्हेही दाखल केले आहेत. त्यानंतरही दूषित पाणी नदीत सोडले जात आहे. शहरातून वाहणारी पवना नदी कधी जलपर्णी, तर कधी रसायनयुक्त पाण्यामुळे चर्चेत असते. थेरगाव येथील केजुबाई बंधारा या ठिकाणाहून वाहणाऱ्या पाण्यावर तवंग आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु