
देवरूखमध्ये ‘कला-साहित्य-संस्कृती व्यवहार’ परिसंवाद संपन्न
रत्नागिरी, 22 नोव्हेंबर (हिं.स.) : आदिमानवाने रेषारेघोट्यांद्वारे व्यक्त केलेली अभिव्यक्ती पुढे समृद्ध चित्रकलामाध्यमात रूपांतरित झाली असून “विविध काळातील चित्रांचे वाचन झाले पाहिजे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व कादंबरीकार प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी केले. ते देवरूख येथे आयोजित ‘कला-साहित्य-संस्कृती व्यवहार’ परिसंवादाचे बीजभाषण करताना बोलत होते.
प्रा. श्री. पु. भागवत जन्मशताब्दी सांगतापूर्ती निमित्त
देवरूख येथील डी-कॅड कॉलेजमध्ये आयोजित या राज्यस्तरीय परिसंवादात मोठ्या संख्येने वाङ्मय अभ्यासक सहभागी झाले. ख्यातनाम संपादक-समीक्षक प्रा. श्री. पु. भागवत यांच्या जन्मशताब्दी सांगतापूर्ती निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. अनुष्टुभ् प्रतिष्ठान यांनी आयोजनाची जबाबदारी स्वीकारली होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन क्रेडार संस्थेचे संस्थापक कै. बाळासाहेब व विमलताई पित्रे यांच्या स्मृतीनिमित्त पोर्ट्रेटसमोर अभिवादन करून झाले. यावेळी प्रा. वसंत डहाके, अजय पित्रे, प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, प्रा. प्रवीण बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बीजभाषण :- “चित्र हे माणूस आणि त्याचा काळ यांचे पुस्तक”
प्रा. डहाके म्हणाले,
“चित्र केवळ पाहण्यासाठी नसते; ते वाचता आले पाहिजे. चित्रातील मानसप्रेरणा, संस्कृती, समाजस्थिती आणि कालखंडाची सूक्ष्म माहिती सातत्याने वाचनातून उलगडते.”
सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचा संदर्भ देत त्यांनी लोककला, संगीत, नृत्य इत्यादी कलांना संस्कृतीचे आद्याविष्कार ठरविले.
चार सत्रांत व्यापक चर्चा
१) लोकसंस्कृती
शाहीर शाहीद खेरटकर यांनी लोकगाणी व लोकवाद्यांच्या माध्यमातून लोकसंस्कृतीतील अध्यात्मिक व जीवनमूल्यांची ओळख करून दिली.
डॉ. गोविंद काजरेकर यांनी लोकसंस्कृतीचा वैविध्यपूर्ण पट मांडला, तर मुकुंद कुळे यांनी ग्रामजीवन-नागरजीवनातील फरक आणि वाद्यपरंपरांचे विश्लेषण केले.
अध्यक्षस्थानी अतुल पेठे होते. त्यांनी कथाकीर्तन परंपरेला आधुनिक आशय देण्याची गरज अधोरेखित केली.
२) भाषासंस्कृती
प्रा. दीपक पवार यांनी मराठी भाषेवरील होत असलेल्या अवहेलनाबद्दल तीव्र भाष्य केले.
डॉ. प्रकाश परब यांनी शिक्षण प्रणालीतील मराठीच्या दुय्यमीकरणाची जबाबदारी शासनावर टाकली.
अध्यक्ष डॉ. दिलीप धोंगडे यांनी मराठीतील आदरार्थी सर्वनामे आणि वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक महत्त्वावर चर्चा केली.
३) माध्यमसंस्कृती
पराग वडके यांनी आदिम संवाद ते डिजिटल माध्यमांच्या प्रवासाचा आढावा घेतला.
अभिनेत्री-दिग्दर्शिका संपदा जोगळेकर यांनी मनोरंजन क्षेत्रातील तडजोडी आणि माध्यम-जागरूकतेवर भाष्य केले.
युवराज मोहिते यांनी ‘बंगाल गॅझेट’च्या इतिहासासह विविध माध्यमांचे सामाजिक उत्तरदायित्व स्पष्ट केले.
अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी आधुनिक माध्यमांची वेगवान पण अविश्वसनीय होत चाललेली संरचना उलगडली.
४) वाङ्मयीन संस्कृती
प्रा. शीतल पावसकर-भोसले यांनी साठोत्तर मराठी वाङ्मयातील सत्तासंबंध आणि सामाजिक आयामांवर सखोल विचार मांडला.
प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी नियतकालिके ही वाङ्मयीन संस्कृतीचा आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट केले.
अध्यक्ष प्रा. डॉ. प्रभा गणोरकर यांनी प्रकाशनगृहे, संपादक व ग्रंथपाल यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
त्यांनी मौज प्रकाशन आणि प्रा. श्री. पु. भागवत यांच्या परंपरेचा गौरव केला.
समारोपप्रसंगी डॉ. सुरेश जोशी यांनी प्रा. श्री. पु. भागवत यांच्या साहित्यकार्यातील मोलाचे योगदान उलगडले.कार्यक्रमाच्या यशासाठी डी-कॅड कॉलेज व अनुष्टुभ् प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे कौतुक करण्यात आले.परिसंवादातील चर्चा, निवडलेले अभ्यासक आणि डहाके–गणोरकर दांपत्य तसेच अतुल पेठे यांचा सहभाग यामुळे हा ऐतिहासिक कार्यक्रम संस्मरणीय ठरल्याचे मान्यवरांनी नमूद केले.सूत्रसंचालन प्रा. डॉ. वर्षा फाटक यांनी माहितीपूर्ण शैलीत केले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी