
परभणी, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। पाथरी येथील नगरपालिका हद्दीतील एकता नगर परिसरात एका रॅली दरम्यान काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यात मोठा संघर्ष झाल्यामुळे येथील निवडणूकीचे वातावरण चांगलेच पेटले आहे.
गेल्या 25 वर्षांपासून पालिकेवर सत्ता राखणारे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात या निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते सईद खान व आमदार राजेश विटेकर यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे येथील निवडणूक लक्षवेधी व प्रतिष्ठेची ठरली आहे. या निवडणूकीचे वातवरण चांगलेच पेटणार हे ही चित्र स्पष्ट झाले आहेत. त्याचेच प्रत्यंतर एकता नगर परिसरात एका रॅली दरम्यान काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. या दोन्ही गटात अश्लिल शिवीगाळीसह हमरी-तुमरी व धावून जाण्याचे प्रकार घडले, दोन्ही गटाने एकमेकांवर दगडेही भिरकावली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तर जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी पाथरीत तळ ठोकून या निवडणूकीतील पेटलेल्या राजकारणासह स्थितीचा आढावा घेतला व संभाव्य घटना टाळण्याकरीता काय करता येईल, या संदर्भात अधिकार्यांबरोबर चर्चा केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis