
सोलापूर, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। पंढरपूर तालुका पोलिसांनी भीमानदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान ५० ब्रास वाळूसह १ कोटी २५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरसाळे व शेळवे येथील भीमानदी पात्रात करण्यात आली आहे.
गुरसाळे व शेळवे (ता. पंढरपूर) येथे भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला असता, जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले.गुरसाळे येथील कारवाईत ५८ लाख ८० हजार तर शेळवेत ६७ लाख ८ हजार रुपये असा एकूण १ कोटी २५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येथील कारवाईत सोमनाथ गणतत शिरतोडे, पंकज कोळेकर, विनोद कोळेकर, विनोद चव्हाण, वैभव कोळेकर, समधान चव्हाण, अतुल पवार, सौदागर शिंदे व अन्य तीन ते चार इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड