
पुणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रारुप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ठ होणा-या संबंधित विधानसभा क्षेत्रांच्या दिनांक १ जुलै २०२५ अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीवरुन महानगरपालिकेची प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी गुरुवारी २० नोव्हेंबर २०२५ रोजी मतदार यादी कक्ष तसेच आठ क्षेत्रीय कार्यालयात आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्याwww.pcmcindia.gov.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना स्विकारण्यासाठी २७ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती सूचना आणि आक्षेपांची गांभिर्याने दखल घ्यावी असे निर्देश निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार यांच्यासह स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत शिंपी, उप आयुक्त पंकज पाटील, डॉ. प्रदिप ठेंगल, संदिप खोत, सिताराम बहुरे, चेतना केरुरे, सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच प्रारुप मतदार यादी हरकत व सूचना कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु