
रायगड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातून हजारो मेंढ्या व कुटुंबाबरोबर स्थलांतर करणारे मेंढपाळ पुन्हा एकदा चारापाणीच्या शोधात रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्याच्या सुरुवातीला हे धनगर कुटुंबे रायगडातील माळराने, शेतजमिनी आणि पाणवठ्यांचा आधार घेत काही महिन्यांचा तात्पुरता मुक्काम करणार आहेत. हिवाळा संपताच हे कुटुंबे आपल्या मूळ गावी परतणार आहेत.
पुणे, जेजुरी व घाटमाथ्यावरील दुष्काळग्रस्त भागांत पाण्याची व चाऱ्याची तीव्र टंचाई असल्याने मेंढपाळांना दरवर्षी स्थलांतर करावे लागते. यंदा पाऊस उशिरापर्यंत पडला असला तरी, मेंढपाळांनी आपली पारंपरिक वाटचाल कायम ठेवत अलिबाग, पेण, मुरुड, उरण व रायगड जिल्ह्यातील खारेपाट परिसरात तळ ठोकला आहे. येथे मुबलक चारा, पाण्याची उपलब्धता आणि मोकळे कुरणे असल्याने त्यांच्या मेंढ्यांना अनुकूल वातावरण मिळते.
या मेंढपाळ कुटुंबांची उपजीविका पूर्णपणे मेंढ्यांवर अवलंबून असते. स्थलांतर हेच त्यांचे अर्थचक्र चालवण्याचे प्रमुख साधन आहे. स्थानिक शेतकऱ्यांसाठीही मेंढपाळ महत्त्वाचे ठरतात. शेतकरी आपल्या शेतात मेंढ्या बसवण्यासाठी धान्य किंवा ठराविक रक्कम देतात. मेंढ्यांचा मुक्काम शेताला नैसर्गिक खत देतो आणि जमीन कसदार बनते. त्यामुळे शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यातील परस्परपूरक नाते आजही ग्रामीण भागात टिकून आहे. यंदा मात्र काही ठिकाणी अजूनही पावसाचा जोर असल्याने या मेंढपाळांना सुरक्षित मुक्कामाची अडचण निर्माण झाली आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचले असल्याने मेंढ्या बसविणे कठीण ठरत आहे. तरीही उदरनिर्वाहासाठी स्थलांतर हा एकमेव पर्याय असल्याने त्यांनी रायगडाचा रस्ता धरला आहे.
“घाटमाथ्यावर चारा-पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इकडे यावं लागतं. येथे मेंढ्यांना चांगला चारा मिळतो, शिवाय शेतकरी धान्य व पैसे देतात,” असे एका मेंढपाळाने सांगितले. रायगडातील नैसर्गिक संपत्तीमुळे मेंढपाळ बांधवांचा तात्पुरता निवारा या वर्षीही मिळत राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके