
सोलापूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात अतिरिक्त झालेल्या उर्दू शिक्षक समायोजनात गोंधळ करण्यात आला आहे. हत्तुर जिल्हा परिषदेच्या शाळेवर करण्यात आलेल्या शिक्षकाची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या नियुक्तीबाबत शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे.राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झाल्या. या बदल्यात उर्दू शिक्षकांना शाळा न मिळाल्यामुळे त्यांनी नकार दिला. यातून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नुकतेच समायोजन केले आहे. ऑनलाइन बदल्यात शाळा न मिळालेल्या दोन शिक्षकांचे समायोजन होऊ शकले नव्हते. त्यामुळे या शिक्षकांचा पगार निघत नव्हता. या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. यामध्ये एका शिक्षिकेची औराद तर दुसऱ्या शिक्षकाची हत्तूर शाळेवर नियुक्ती करण्यात आली आहे. हत्तुर शाळेवर नियुक्त करण्यात आलेल्या अख्तर शेख यांची नियुक्ती आता वादात सापडली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड