शालेय विद्यार्थी - विद्यार्थीनींसाठी एसटीची ' हेल्पलाईन '- परिवहन मंत्री
धाराशिव, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी या
धाराशिव


धाराशिव, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी लवकरच एसटी महामंडळाची ' हेल्पलाइन ' सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली.

ते धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिल्यानंतर तेथील उपस्थित विद्यार्थी -विद्यार्थ्यांची संवाद साधताना बोलत होते.

राज्यभरातील लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटी महामंडळ शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी बस फेऱ्या पूरवित असते. राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मानव विकास निधी अंतर्गत राजाच्या दुर्गम व आदिवासीबहुल भागामध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्यासाठी ' मानव विकास बसेस ' उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या बसेस विशेषत: शालेय विद्यार्थिनींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात याव्यात . अशा सक्त सूचना देण्यात आलेले असतात. परंतु अनेक आगारात या नियमाची पायमल्ली केलेली दिसून येते. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली असता, तेथे उपस्थित असणाऱ्या शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींनी याबाबत अनेक समस्या व तक्रारी मंत्री महोदयांसमोर मांडल्या . अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार त्यातील काही विद्यार्थ्यांनी केल्या . तसेच संध्याकाळच्या वेळी शाळा -महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले आपल्या घरी जाणे अपेक्षित असते. तथापि, बसेस वेळेवर न आल्याने अथवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहोचण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकाचे ओरडे खावे लागतात. अनेक ठिकाणी तर गैरसमजातून पालकांनी विद्यार्थ्यांना उशिरा येण्याबद्दल शिक्षाही दिलेल्या आहेत. याचा विपरीत परिणाम म्हणून काय विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. याबाबत एसटीच्या स्थानिक प्रशासनाने अतिशय गांभीर्याने या गोष्टी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

लवकरच विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू होणार

शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना आपल्या घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे ,तांत्रिक बिघाडामुळे बस नादूरूस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एसटीच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून मदत घ्यावी या हेतूने लवकरच एक हेल्पलाइन क्रमांक प्रदर्शित करण्यात येईल , तसेच ३१ विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येतील जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी देखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडू शकतात. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री.प्रताप सरनाईक यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर

एसटी बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत, काही वेळेला त्यांची महत्त्वाची परीक्षा देखील बुडते . विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल! तसेच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकार्‍यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande