
* निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे संपर्क प्रमुखांना निर्देश
मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची आज घोषणा करण्यात आली. नगर पंचायत, नगर परिषदा आणि आगामी जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकीत भक्कमपणे लढण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुखपदी पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी जिल्ह्यातच थांबावे, असे निर्देश शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
शिवसेना सचिव संजय मोरेंकडून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले असून राज्यातील ४० ठिकाणी पक्षाकडून जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी किरण पावसकर आणि राजेश मोरे यांच्याकडे देण्यात आली आहे. रत्नागिरीसाठी यशवंत जाधव, रायगड ग्रामीणसाठी संजय घाडी, पालघरसाठी रवींद्र फाटक, ठाणे ग्रामीण प्रकाश पाटील, पिंपरी चिंचवड शहरासाठी सिद्धेश कदम, पुणे ग्रामीणसाठी खासदार श्रीरंग बारणे आणि राम रेपाळे, सातारा शरद कणसे, सांगली राजेश क्षीरसागर, कोल्हापूर खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक, सोलापूर संजय कदम, नाशिक लोकसभेसाठी राम रेपाळे, दिंडोरी लोकसभेसाठी राम रेपाळे यांच्यासह भाऊसाहेब चौधरी यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी सुनिल चौधरी, नंदुरबारसाठी राजेंद्र गावित, धुळयाची जबाबदारी मंजुळा गावित यांच्यावर सोपवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरात महानगरचे संपर्कप्रमुख विलास पारकर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी अर्जुन खोतकर, जालनासाठी अर्जुन खोतकर आणि भास्कर आंबेकर यांची निवडणूक केली आहे. बीडमध्ये टी. पी मुंडे आणि मनोज शिंदे, धाराशीवसाठी राजन साळवी, नांदेडसाठी सिद्धराम म्हेत्रे, लातूरसाठी किशोर दराडे, बुलढाणामध्ये हेमंत पाटील, परभणीमध्ये आनंद जाधव, नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहरसाठी दिपक सावंत तसेच गडचिरोलीसाठी दिपक सावंत यांच्यासह किरण पांडव यांच्यावर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भंडारासाठी गोपीकिशन बाजोरिया, अमरावतीसाठी नरेंद्र भोंडेकर, वर्धासाठी राजेंद्र साप्ते, यवतमाळमध्ये हेमंत गोडसे, वाशिममध्ये जगदीश गुप्ता, हिंगोलीमध्ये हेमंत पाटील, अकोलामध्ये अभिजित अडसूळ, चंद्रपूर किरण पांडव आणि अहिल्यानगरमध्ये विजय चौघुले यांची जिल्हा संपर्क म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी