
सोलापूर, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। आश्रमशाळेतील शिक्षकांना टीईटी परीक्षा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केल्याचा आदेश शासनाने काढला होता. तो आदेश रद्द करावा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेकडून करण्यात आली होती. त्याला यश आले असून, टीईटी परीक्षा बंधनकारक आदेश तात्पुरता रद्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळांतील सर्व शिक्षकांना दि. 17 ऑक्टोबर 2025 च्या पत्रानुसार उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले होते. तसेच दोन वर्षात शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवा सक्तीने समाप्त करण्यात येतील, अशा प्रकारचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे आश्रमशाळेतील शिक्षक अडचणीत आले होते. त्यामुळे हा आदेश रद्द करावा, अशी मागणी शिक्षकांतून करण्यात आली होती. त्याला यश आले आहे.दरम्यान, ग्रामविकास विभाग, शालेय शिक्षण विभागाने अद्यापही दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावा अन्यथा सेवा समाप्त करण्यात येईल, असा आदेश काढला नाही. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने तो आदेश तातडीने का काढला, असा सवाल शिक्षकांतून उपस्थित होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड