
पुणे, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। राज्यात ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या गतवर्षीपेक्षा यंदा वाढण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत १९३ कारखान्यांना साखर आयुक्तालयाने परवाने दिले आहेत. तर २१ कारखान्यांचे प्रस्ताव विविध पातळ्यांवर प्रलंबित आहेत, तसेच गतवर्षीच्या रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) न दिलेल्या ३८ कारखान्यांना राज्य सरकारच्या सूचनेनुसार गाळप हंगामासाठी परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली. २०२४-२५ मध्ये २०० कारखान्यांनी गाळप घेतले होते. त्यामध्ये ९९ सहकारी तर १०१ खासगी कारखान्यांचा समावेश होता. साखर आयुक्तालयाकडून आत्तापर्यंत १९३ कारखान्यांना परवान्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये ९४ सहकारी आणि ९८ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. तर २१ कारखान्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यातील १५ कारखान्यांनी शासनाने निश्चित केलेला निधी भरलेला नाही, तसेच इतर कारणांनी त्यांचा प्रस्ताव माघारी पाठविण्यात आला आहे, तर पाच प्रस्तावांची प्रादेशिक कार्यालयात आणि एका प्रस्तावाची साखर आयुक्तालयात छाननी सुरू आहे. १९३ पैकी आत्तापर्यंत १४७ कारखान्यांनी गाळप हंगाम घेण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर विभागातील ३२ सर्वाधिक कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु