
सोलापूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
विधानसभा निवडणुकीत अस्तित्व हरवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पायाभरणी मानली जात आहे. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची पूर्ण मदार कुर्डुवाडी नगरपरिषद व अकलूज नगरपरिषदेवर असणार आहे. या दोन नगरपरिषदेत राष्ट्रवादी कशी कामगिरी करणार? यावर जिल्ह्याच्या नागरी भागातील राष्ट्रवादीचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.कुर्डुवाडीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकाच्या सर्वच्या सर्व २० जागांवर घड्याळाचे उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत माजी आमदार शिंदे यांनी रिपब्लिकन पार्टीला सोबत घेतले आहे. माढा तालुक्यात असलेल्या आणि करमाळा विधानसभेत येणाऱ्या कुर्डुवाडी नगरपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादीसाठी व माजी आमदार शिंदे यांच्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या निवडणुकीच्या निकालावर भविष्यातील अनेक राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड