
परभणी, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)। परभणी शहरातील पाथरी रोड, लक्ष्मीनगरी येथे ए. आर. स्टड फॉर्म व सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने आयोजित अश्वचाल रेवाल चाल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग चौथ्या वर्षी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जात पार पडली असून विविध राज्यांतील घोडे, मालक व सवार यांच्या सहभागामुळे वातावरण उत्सवमय झाले.
स्पर्धेत बिहारचे सय्यद फरहान अहमद यांच्या एकता एक्सप्रेस या घोड्याने मेघू भाई यांच्या उत्कृष्ट सवारीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. मध्य प्रदेशातील लोकेश पवार यांच्या उडान या घोड्याने उस्मान यांच्या सवारीसह द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक हरियाणाचे बाबा राजुदास यांच्या बादल घोड्याने मोहित यांच्या सवारीसह पटकावला. परभणीच्या कामरान खान यांच्या बाजीगर या घोड्याने सवार अदनान खान यांच्या जोडीने चौथा क्रमांक मिळवून स्थानिकांची शान वाढवली. पाचवा क्रमांक उत्तर प्रदेशचे अब्दुल्ला खान यांच्या अल-उफजल घोड्याने सवार अजून खान यांच्या मदतीने पटकावला.
परभणीतील तुडुंब भरलेल्या प्रेक्षकांच्या आवाजात स्पर्धा अत्यंत रंगतदार वातावरणात पार पडली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब अशा विविध राज्यांतून मालक आणि सवारांनी आपल्या घोड्यांसह सहभाग घेतल्याने स्पर्धेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. 80 वर्षांच्या ज्येष्ठ सवारांपासून ते 10–12 वर्षांच्या बाल सवारांपर्यंत विविध वयोगटातील घोडेस्वार पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांची विशेष आनंदाची प्रतिक्रिया उमटली.
या कार्यक्रमास परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, आमदार राहुल पाटील, माजी आमदार सुरेश दादा देशमुख, माजी आमदार विजयराव वरपूडकर, बाळासाहेब वरपूडकर, विवेक नावंदर तसेच स्पर्धेचे संकल्पक सय्यद अबूबकर भाईजान व सय्यद कादर उपस्थित होते. स्पर्धेच्या नियोजनात शोएब भाई व रजाक भाई या दोन्ही भावंडांनी अत्यंत सुंदर, नीटनेटके आणि आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव देणारे आयोजन केले.
स्पर्धेचे धावते, रंगतदार समालोचन अश्वपरीक्षक प्रकाश बारबिंड आणि वाजेद भाई यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ए. आर. स्टड फॉर्मच्या सर्व कार्यकर्त्यांनी मागील महिनाभर दिवस-रात्र मेहनत घेऊन मैदानाची तयारी केली.
उत्तम नियोजन, शिस्तबद्ध वातावरण, भव्य गर्दी आणि खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण सादरीकरणामुळे परभणीतील ही रेवाल चाल स्पर्धा यंदाही अविस्मरणीय ठरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis