
पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन २०२५’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवकालीन शौर्य, सांस्कृतिक वैभव आणि नदी संवर्धनाचा संदेश यांचा अनोखा मेळ यंदाच्या सायक्लोथॉनमध्ये पाहायला मिळाला. यामध्ये ५१ हजार सायकलपटू सहभागी झाले होते.
मोशीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरातून रविवारी पहाटे सहा वाजता सायक्लोथॉनची सुरुवात झाली. रणमर्द शिलेदारांचे संचलन, मर्दानी खेळ, ढोल-ताशांचा गजर आणि मशाल-दिवटी नृत्य यांच्या सादरीकरणांनी शिवराज्यकालीन पराक्रमाची जिवंत झलक उपस्थितांना अनुभवता आली. शिव-शंभू गर्जनेने परिसर दणाणून गेला.
आमदार महेश लांडगे, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र, डब्ल्यूटीई फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही सायक्लोथॉन संपन्न झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु