
रायगड, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)। “श्रीवर्धनमध्ये आजवर झालेला विकास हा सर्वसामान्यांचा नसून ठेकेदार, काही पुढारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा विकास आहे,” असा घणाघात शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी श्रीवर्धनमध्ये केला. श्रीवर्धनात झालेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
सोहळ्यात घोसाळकर यांनी महायुतीतील समन्वयावरही ताशेरे ओढले. “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत आम्ही महायुती म्हणून खासदार सुनील तटकरे यांना मनापासून सहकार्य केले. हे सहकार्य मतदानातूनही स्पष्ट दिसून आले. मात्र, खासदारांनी युतीचा धर्म पाळला नाही. आघाडी करण्याचे आश्वासन वारंवार दिले, परंतु शेवटच्या क्षणी पाठिंबा न मिळाल्याने आम्हाला स्वतंत्रपणे निवडणुकीला जावे लागत आहे,” अशी टीका त्यांनी केली.
नामदार भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्रीपदापासून वगळण्यात आले, याबाबतही घोसाळकरांनी असंतोष व्यक्त केला. “गोगावले यांच्यावरील अन्यायामुळे महायुतीमध्ये नाराजी आहे. आणि या परिस्थितीसाठी तटकरे जबाबदार आहेत,” असे ते म्हणाले.
तटकरे यांच्या विकासाच्या दाव्यांना उत्तर देताना घोसाळकर म्हणाले, “शहरात कुठल्याही ठोस विकासाची चिन्हे नागरिकांना दिसत नाहीत. रस्ते, पाणी, गटार यांसारख्या मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण झाल्या नाहीत. प्रत्यक्षात दिसणारा विकास हा ठेकेदारांची आणि काही निवडक पदाधिकाऱ्यांची भरभराट आहे. शिवसेना मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठामपणे उभी असून जात-धर्म न पाहता प्रत्येकाला न्याय मिळवून देणार आहे.”
उद्घाटन प्रसंगी श्रीवर्धन मतदारसंघ संपर्कप्रमुख सचिन पाटेकर, तालुकाप्रमुख सुरेश मिरगळ, उपतालुकाप्रमुख ओमकार शेलार, शहरप्रमुख सावन तवसाळकर, अविनाश कोळंबेकर, प्रितम श्रीवर्धनकर, देवेंद्र भुसाणे, वसंत यादव, गणेश मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके