निवडणुकांमध्ये लढलो म्हणजे ते आमचे शत्रू नाहीत - एकनाथ शिंदे
सोलापूर, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)। राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि एकमेकांच्या पक्ष फोडीवरून वादाची ठिणगी पडली असल्याचे चित्र आहे. या चर्चांमध्ये उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांन
निवडणुकांमध्ये लढलो म्हणजे ते आमचे शत्रू नाहीत - एकनाथ शिंदे


सोलापूर, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)।

राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि एकमेकांच्या पक्ष फोडीवरून वादाची ठिणगी पडली असल्याचे चित्र आहे. या चर्चांमध्ये उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांचीही भेट घेतली होती. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. महायुतीत तणावाचं चित्र असताना आपला शत्रू कोण, यावर थेट भाष्य केले आहे.

सोलापूरमधील अक्कलकोट येथे निवडणूक प्रचारासाठी एकनाथ शिंदे दाखल झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत राहून नरेंद्र मोदींचे हात आम्ही अधिक बळकट केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो आणि प्रचंड यश मिळवले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लढलो म्हणजे ते आमचे शत्रू नाहीत असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर असून अक्कलकोट येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काहींच्या पोटात दुखायला लागलं आहे. अजूनही काहींना एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला पचत नाही. त्यामुळे त्यांची मळमळ अजूनही सुरूच असल्याचा टोला विरोधकांना लगावला. त्यांनी पुढे म्हटले की, “माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. मी कुठून आलो? एक साधा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, ही गोष्ट काहींना अजूनही समजत नाही. माझे नाव घेतल्याशिवाय काही लोकांना झोप लागत नाही, भूक लागत नाही आणि दिवस सुरु होत नाही. अशी खरमरीत टीका त्यांनी केली. महायुतीचं सरकार चांगलं काम करत आहे. काही माध्यमांमधून सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु जनता भ्रमित होणार नाही. कारण जनता आणि आमचे कार्यकर्ते वास्तव जाणतात.” असे शिंदे यांनी म्हटले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande