
बीड, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। गेवराई नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवक पदासाठी ११ प्रभागांतील २२ जागांसाठी ६५ उमेदवार उभे राहिले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी ४ आणि नगरसेवक पदासाठी ४८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये गेवराईत भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गटात थेट लढत होणार आहे.
मुख्य लढत भाजपच्या गीता बाळराजे पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शितल महेश दाभाडे यांच्यात होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांनी गेवराईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. प्रचारही आक्रमक पद्धतीने हाती घेतला आहे. मात्र, त्यांना शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवाराचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे लढती अधिकच गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. काही प्रभागांमध्ये लहान गटांचा प्रभाव निर्णायक
ठरणार आहे.
त्यामुळे प्रमुख पक्षांचे मतविभाजन होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून संदीप साळवे हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. मात्र प्रभागांमध्ये काँग्रेसला उमेदवार उभे करता आले नाही. शहरात निवडणूक वातावरण तापले आहे. अपक्ष उमेदवारांनीही काही ठिकाणी प्रमुख उमेदवारांना आव्हान दिले आहे. प्रचारासाठी दारोदारी मोहीम, सभा, बैठका, सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची अवस्था, करप्रणाली, नागरी सुविधा हे मुद्दे प्रचारात ऐरणीवर येणार आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेले उमेदवार असे - शितल महेश दाभाडे (राष्ट्रवादी अजित पवार गट), गीता त्रिंबक उर्फ बाळराजे पवार (भाजप), जबीन जान महंमद बागवान (राष्ट्रवादी शरद पवार गट), साधना मुकेश महाजन (शिंदे शिवसेना), संदीप मारोती साळवे (राष्ट्रीय काँग्रेस) आणि संगिता शाम गायकवाड (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis