पाचव्या स्मृतिदिनीच जमील शेखच्या पत्नीने राष्ट्रवादी (श.प.) कडे भरला उमेदवारी अर्ज
ठाणे, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)। राबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्येला आज ( दि. 23) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या स्मृतिदिनीच खुशनुमा जमील शेख यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडे आपला अर्ज दाखल केल
ठाणे


ठाणे, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)। राबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्येला आज ( दि. 23) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या स्मृतिदिनीच खुशनुमा जमील शेख यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडे आपला अर्ज दाखल केला आहे. सरकार, पोलीस यांच्याकडून न्याय मिळत नसल्यानेच आपण जनतेच्या न्यायालयात फिर्याद करीत आहोत, असे यावेळी खुशनुमा शेख यांनी म्हटले. तर, जमील शेख यांना न्याय द्यायचा असेल तर खुशनुमा शेख यांना विजयी करणे आपली जबाबदारी आहे, असे याप्रसंगी मनोज प्रधान म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी 23 नोव्हेंबर रोजी राबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मारेकऱ्यांना अटक करण्यात आली असली तरी मुख्य सूत्रधारावर अद्यापही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप जमील शेख याचे कुंटुबिय करीत आहेत. या संदर्भात विधिमंडळातही चर्चा झाली असून चौकशीचे आदेश देऊनही तपास पुढे सरकलेला नाही. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी आगामी ठाणे महानगर पालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्धार खुशनुमा शेख यांनी व्यक्त केला आहे.

आज खुशनुमा शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी जोबिया, जमील सुलेमानी, जतीन कोठारे, मकसूद खान, राजेश साटम, सचिन पंधरे आदी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खुशनुमा शेख यांनी सांगितले की, जमील यांची हत्या करण्याच्या काही काळ आधी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी जमील यांनी हा हल्ला नजीब मुल्ला यांनीच केला होता. तसेच, नजीब मुल्ला आपणाला ठार मारतील, असा जबाब पोलिसांना दिला होता. जमील शेख यांचा मारेकरी ओसामा यानेही मुल्ला यांचे नाव घेतले आहे. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अधिकारी यांचे उंबरठे आपण न्यायासाठी झिजवले आहेत. प्रत्येकवेळी आश्वासनच मिळाले आहे. त्यामुळेच आपण आता जनतेच्या न्यायालयात जाऊन जमील यांच्यासाठी न्याय मागणार आहोत. त्यासाठीच राबोडीतून म्हणजेच प्रभाग क्रमांक दहामधून निवडणूक लढविणार आहोत.

दरम्यान, मनोज प्रधान यांनी, जमील शेख यांचे कुटुंबीय पीडित आहे. न्यायासाठी ते वणवण करीत आहेत. आता ते जनतेकडेच न्याय मागत आहेत. शरदचंद्र पवार आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड हे नेहमीच शोषित - पीडित वर्गाच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यामुळे खुशनुमा शेख या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात आल्या आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande