
रत्नागिरी, 23 नोव्हेंबर, (हिं. स.) : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयएसटीई (ISTE) विद्यार्थी चॅप्टरची बेस्ट स्टुडंट चॅप्टर (पदवी) - ISTE महाराष्ट्र-गोवा विभाग पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुण्यातील ट्रिनिटी कॉलेजमध्ये झालेल्या आयएसटीई विद्यार्थी अधिवेशनादरम्यान पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. प्राचार्य डॉ. महेश भागवत यांना समारंभात सन्मानित करण्यात आले.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुनील भिरूड, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. विलास सपकाळ, सहसंचालक (तांत्रिक शिक्षण, पुणे), डॉ. डी. व्ही. जाधव, आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, डॉ. सुहास खोत (प्राचार्य, केजेसीईएमआर, पुणे) आणि इतर अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
आयएसटीई ही एक देशातील तांत्रिक शिक्षण आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांची गुणवत्ता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणारी सर्वांत मोठी स्वायत्त संस्था आहे. दरवर्षी आयएसटीई संस्था विद्यार्थी अधिवेशनादरम्यान राज्य विभागातून नामांकित केलेल्या बेस्ट स्टुडंट चॅप्टर (पदवी किंवा पदविका प्रदान करणाऱ्या संस्थांना) सन्मानित करते. या पुरस्कारासाठी महाविद्यालयांची निवड करताना त्यांच्या विद्यार्थी चॅप्टरची शैक्षणिक उत्कृष्टता, नेतृत्व आणि आयएसटीई कार्यक्रम तसेच उपक्रमांमधील महाविद्यालयाचे योगदान यांचा प्रामुख्याने विचार केला जातो.
महाविद्यालयाचे आयएसटीई विद्यार्थी आणि प्राध्यापक विभागप्रमुख डॉ. एस. एन. वाघमारे तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांसाठी आयएसटीई अंतर्गत आयोजित केलेलै विविध कार्यक्रम तसेच उपक्रमांमुळे महाविद्यालयाने या पुरस्काराला गवसणी घातली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी