
पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। नवले पूल अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) खेड शिवापूर टोल नाका येथे दोन वायुवेग पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाकडून वाहनांवर कारवाई केली जात आहे. सकाळी आरटीओ प्रशासन व दुधभाते नेत्रालयाच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर झाले. यावेळी पुणे-सातारा महामार्गावर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना थांबविण्यात आले.
ट्रक, कंटेनरसारख्या अवजड वाहनांची वाहतूक करणाऱ्या चालकांना दूरचे दिसत नाही. काहींना मोतिबिंदू, तर काहींच्या चष्म्याचा नंबर वाढलेला; अनेकांना तर चष्मा लागला आहे, हेच माहीत नाही. खेड शिवापूर टोल नाक्याजवळ वाहनचालकांच्या डोळ्यांची तपासणी केली. तेव्हा ६० पैकी २० चालकांना दृष्टिदोष आढळला. डोळ्यांमध्ये दोष असेल, तर प्रवास सुरक्षित कसा होणार? असा प्रश्न निर्माण होतो.
वाहनाची तपासणी झाल्यानंतर चालकांच्या डोळ्याची तपासणी केली. एका दिवसात ६० चालकांच्या डोळ्याची तपासणी केली. त्यात २० चालकांना दृष्टिदोष आढळून आला. त्यांना तत्काळ चष्मे व अन्य उपायांबाबत माहिती दिली. या चालकांचे वय ३० ते ६० दरम्यान होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक कृष्णात बामणीकर, अमोल दराडे, अर्जुन खिंडारे, माधवी सोनार व अनुजा काळमेघ आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु