
पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयांमध्ये नियमित मूळ अभ्यासक्रमासमवेत सहअभ्यासक्रम (को-करिक्युलर्स कोर्स) सुरू केले आहेत. आतापर्यंत हे अभ्यासक्रम कशा पद्धतीने राबवावेत, नेमके काय-काय शिकवावे, याबाबत ठोस आराखडा नसल्याने महाविद्यालये त्यांच्या स्तरावर अभ्यासक्रम निश्चित करून सहअभ्यासक्रम राबवीत आहेत. परिणामी, सहअभ्यासक्रमांच्या गुणात्मक दर्जाचा प्रश्न समोर येत असून संलग्न महाविद्यालयांचे लक्ष आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सहअभ्यासक्रम धोरणा’कडे लागले असून महाविद्यालयांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
दीड महिन्यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा झाली. त्यात महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सहअभ्यासक्रमाच्या पद्धतीवरून सदस्यांनी विद्यापीठावर ताशेरे ओढले होते. ‘विद्यापीठातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविण्यात येणारे सहअभ्यासक्रम तयार करण्यात येईल. हे सहअभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच अपलोड करण्यात येतील,’ अशी माहिती विद्यापीठाच्या अधिसभेत त्यावेळी दिली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु