
पुणे, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)।महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३५ लाख ५१ हजार मतदार आहेत. त्यातही पुरुषांची संख्या अधिक आहे. मात्र, ४१ पैकी नऊ प्रभागांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महिलांची मते निर्णायक ठरणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे सक्रिय राजकारणात व निर्णय प्रक्रियेत महिलांचे प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढले आहे. पुण्यात १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यात ८३ महिला, तर ८२ पुरुष नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे पुरुषांपेक्षा एक महिला जास्त निवडून येणार आहे. त्यातही खुल्या गटातून एखादी महिला निवडणूक जिंकल्यास संख्या आणखी वाढू शकेल.
महापालिकेने निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. यामध्ये ३५ लाख ५१ हजार ४६९ एकूण मतदार आहेत. त्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या एक लाख १३ हजार ४३० ने कमी आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रभागातील महिला मतदारांची संख्याही कमीच असणार असे वाटते. परंतु, निवडणूक शाखेने जाहीर केलेल्या मतदार यादीमध्ये नऊ प्रभागांत महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु