
रायगड, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येऊ लागल्याने म्हसळा तालुक्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे शिवसेना शिंदे गटात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले असून, तालुका प्रमुखांसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
अलिकडेच शिवसेना शिंदे गटाने म्हसळा नगरपंचायतच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगराध्यक्षांसह काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून राष्ट्रवादीला मोठे आव्हान दिले होते. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी रणनीतीपूर्ण खेळी करत थेट शिवसेना शिंदे गटाच्या संरचनेतच फूट निर्माण केली. या खेळीत तालुका प्रमुख, युवा पदाधिकारी, विभाग प्रमुख आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह शेकडो शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.
खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, युवा प्रमुख स्वप्नील चांदोरकर, साळविंडे विभाग प्रमुख नामदेव घुमकर, माजी सरपंच रामचंद्र बोर्ले, केलटेचे माजी अध्यक्ष गणपत सावंत, शहरप्रमुख पवन भोई, तालुका महिला संघटक गौरी करडे, महिला शहर प्रमुख नेहा पाटुकले यांच्यासह केलटे, तोंडसुरे आणि आसपासच्या गावांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.
सततच्या पक्षांतरामुळे सामान्य कार्यकर्ते आणि नागरिक संभ्रमात पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. निष्ठावंत कार्यकर्ते कोणत्या पक्षाकडे वळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या निवडणुकांत जनता कोणावर विश्वास ठेवणार, यावरच पुढील राजकारणाची दिशा अवलंबून राहणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. एकूणच, म्हसळ्यातील ही राजकीय घडामोड आगामी राजकारणात महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकते, असे बोलले जात आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके