
सोलापूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्याने येत्या २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोरेगावस्थित नेस्को संकुलात, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनद्वारे नवव्या ‘इंटरनॅशनल युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या गणवेष मेळ्याचे उद्घाटन होणार आहे.
राज्यातील वस्त्रोद्योग आणि परिधान क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून या प्रदर्शनाकडे पाहिले जात आहे. यात १५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नाममुद्रा प्रदर्शनांत सहभागी होत असून, ३०,००० पेक्षा अधिक गणवेष रचना आणि १५,००० हून अधिक कापडाच्या नाविन्यता प्रदर्शित केल्या जाणार आहेत. राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे आणि माजी वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांचीही उद्घाटनासमयी उपस्थिती असेल.
तब्बल ६५०० कोटी डॉलरचा टप्पा ओलांडत असलेल्या जागतिक गणवेष बाजारपेठेतील वाढीच्या खुणावत असलेल्या संधी पाहता, वितरक, डीलर्स, रिटेलर्स, संस्थात्मक आणि कॉर्पोरेट खरेदीदार तसेच देश-विदेशातील व्यावसायिकांना जोडणारे हे प्रदर्शन एक उत्कृष्ट व्यासपीठ बनेल, असा आयोजकांना विश्वास आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड